सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाडोत्री म्हणून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात न घेता त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. पक्षाने जर त्यांना तिकीट दिलं तर भाजपचा झेंडा हातात घेऊन त्यांना आम्ही पाडू, असा इशारा मेरुलिंग शिक्षण संस्थेचे चेअरमन सुधीर पवार यांनी दिला.सातारा येथील पक्ष कार्यालयाबाहेर आयोजित केलेल्या सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख व इतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र विकास परिषदेचे अध्यक्ष दीपक पवार, माजी नगरसेवक सागर पावसे, पप्पू लेवे, गीता लोखंडे, बुवा पिसाळ, दादासाहेब रासकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.सुधीर पवार म्हणाले, ह्यपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार बूथ प्रमुख, गटप्रमुख शक्ती प्रमुख हे भाजपचे मालक असतात. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. दीपक पवार यांच्या आदेशाने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाने आयोजित केलेल्या बैठकांसाठी हे सर्व मंडळी स्वत:चा आर्थिक खर्च घालून उपस्थित राहत असतात.
पक्षाला हे दिवस आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे. कार्यकर्ते साखर कारखान्यावरील कामगार अथवा कंत्राटदाराकडे काम करणारी लाचार मंडळी नाहीत तर स्वाभिमानी मंडळी आहेत. एवढ्या वर्षांची मेहनत ही मंडळी वाया घालवणार नाहीत. पीक या कार्यकर्त्यांनी लावलंय आणि कणसं काढायला भलताच माणूस आम्हाला चालणार नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उमेदवारीला आम्हा सर्वांचा विरोध आहे.यावेळी सुधीर पवार यांनी समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना काही प्रश्न विचारुन त्याची उत्तरे त्यांच्याकडून वदवून घेतली. गोळीबार करणारे टोलनाका व दारुच्या दुकानासाठी मारामारी करणारे पक्षात पाहिजेत?, दोन सहकारी बँका, दूध संघ, ग्राहक बाजार, कुक्कुटपालन संस्था, फळे-फुले संघ विकणारे, शरद पवारांना दगा देऊ शकतात ते तुम्हाला का नाही?, साथीदारांना ९0 दिवस तुरुंगात ठेऊन स्वत: दिवाळी साजरी करतात ते कुठले नेते?, आता सत्ता राजवाड्यात पाहिजे का सामान्य घरात? असे प्रश्नही पवार यांनी यावेळी विचारले.दरम्यान, या मेळाव्यामध्ये दीपक पवार सर्व बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, कार्यकारिणी व पदाधिकारी यांच्यावतीने एकमुखाने दीपक साहेबराव पवार यांच्या उमेदवारीचा ठराव करण्यात आला. यासह २२ ठरावांनाही संमती घेण्यात आले. हे ठराव भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविण्यात येणार आहेत.दोन्ही भावांची केवळ नुरा कुस्तीशिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे हे दोघे भाऊ केवळ नुरा कुस्ती खेळत आहेत. आता भाजपमध्ये घुसखोरी करुन दोघांनीही सगळ्यांचा बाजार मांडायचा डाव आखला आहे. त्यांच्या भीतीने आम्ही भाजप सोडणार नाही. तर त्यांना घरात घेऊन त्यांची जागा दाखवू, असेही पवार यावेळी म्हणाले.