सातारा : सज्जनगडाच्या तटावर बसून सेल्फी काढत असताना तोल जाऊन दोनशे फूट दरीत कोसळून युवक मृत्युमुखी पडला. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. अनिकेत बाळू ननावरे (वय १८, रा. खुंटे ता. फलटण) असे त्याचे नाव आहे. सातारा तालुक्यातील गजवडी येथे राहणाऱ्या रोहिदास भंडारे, वामन भंडारे या नातेवाइकांकडे अनिकेत चार दिवसांपूर्वी आला होता. ‘गडावरून फिरून येतो,’ असे सांगून तो सकाळी गेला.गडावरील समाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर तो गडाच्या पाठीमागे असलेल्या धाब्याच्या मारुती या ठिकाणी गेला. गडाच्या तटावर बसून मोबाइलमधून सेल्फी काढत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो तब्बल दोनशे फूट दरीत कोसळला. धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढू नका, असे सर्वजण एकमेकांना सांगत होते़>यापूर्वीही तिघांचा बळीसज्जनगडावर असलेल्या मारुती मंदिराच्या पाठीमागील तटावरून आतापर्यंत तिघांचा जीव गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणी सतर्कतेचे फलक लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सज्जनगडावर सेल्फी काढताना दरीत पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 5:23 AM