आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 6 - येथील रहिमतपूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी दीपाली गुरव यांना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज निलंबित केले. दुसऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपाली गुरव आणि कल्पना कांबळे या रहिमतपूर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. रहिमतपूर पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी हे कर्मचाऱ्यांतर्गत आलेल्या मौखिक तक्रारीची चौकशी करत होते. यावेळी महिला पोलिस नाईक दीपाली गुरव यांनी अनाधिकाराने प्रभारी अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश केला. तसेच त्यांच्या समक्ष महिला पोलिस कर्मचारी कल्पना कांबळे यांना शासकीय गणवेषावर असताना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर हात उचलणे, मारहाणीचे बेशिस्त व उद्धटपणाचे गैरवर्तन केले. त्यामुळे गुरव यांना निलंबित करण्यात आले असून, कल्पना कांबळे यांची कोरेगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांची कोरेगाव पोलिस ठाण्यामार्फत खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)