सातारा : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन वर्षांपासून रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत गावोगावी बैठक घेऊन कारखानदारांचा हिशाेब चुकता करणार आहे, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राजू शेळके यांनी म्हटले आहे की, साखर कारखानदारांकडून रिकव्हरी कमी दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच इथेनॉलसह इतर उपपदार्थांची निर्मिती करून रिकव्हरीत जाणून बुजून घट दाखवायची अन् आम्ही एफआरपीप्रमाणे पैसे दिल्याचे मिरवायचे, असे प्रकारही कारखानदारांनी सुरू केले आहेत. त्याचबरोबर उसापासून मिळणाऱ्या उपपदार्थांचे पैसेही कारखानदार गडप करू लागलेत. हे कारखानदार उपपदार्थांचे उत्पादन वाढवतात आणि साखरेचे थोडेसे कमी करतात. यामुळे कारखान्याची रिकव्हरी कमी होते. त्यामुळे साहजिकच रिकव्हरीवर आधारित एफआरपीही कमी होत आहे. अशा पध्दतीने शेतकर्यांना लुटण्याचा नवा मार्ग कारखानदारांनी शोधला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कंगाल होऊ लागला आहे. कारखानदार मात्र, शेतकऱ्यांचे पैसे बुडवून मालामाल होत चाललेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाम गाळून, कर्ज काढून, प्रचंड कष्ट व मेहनत करून ऊस पिकवलेला असतो. या उसाच्या बिलातून त्याला कर्ज फेडायचे असते. इतर खर्च भागवायचे असतात. मात्र, त्याच्या घामाच्या दामाला योग्य भावच कारखानदार देत नाही. तसेच त्यांची विविध पध्दतीने लूट केली जात आहे.साखर कारखानदार रिकव्हरी कमी करून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतायचे काम करू लागले आहेत. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियानाच्या अंतर्गत जागृती करून शेतकऱ्यांना संघटीत केले जाणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच सातारा जिल्ह्यात गावोगावी बैठका, सभा घेऊन आगामी काळात कारखानदारांचा सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर दरोडा टाकत आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांत जागृती करुन याचा हिशोब कारखानदारांकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर यंदाच्या हंगामात सगळे हिशोब चुकते केल्याशिवायही शांत बसणार नाही. हे कारखानदारांनी व शासनानेनीही लक्षात घेण्याची गरज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना