पाचवड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी पाटबंधारे वसाहतीशेजारी असणाऱ्या पुलावर साखरेची पोती वाहून नेणारा ट्रक टायर फुटून पलटी झाला. हा अपघात रविवार, दि. २७ रोजी दुपारी बाराच्या सुमारास झाला. यामध्ये वाहनचालक अजय क्षीरसागर (वय २३, रा. बार्शी, जि. सोलापूर) हा जखमी झाला आहे.
घटनास्थळ व भूईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजय क्षीरसागर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर येथून गुजरातला साखरेची पोती घेऊन ट्रक भरधाव वेगात निघाला होते. पुणेच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला (एमएच ०९ सीव्ही ६६५७) मालट्रक आनेवाडी येथील पाटबंधारे वसाहतीशेजारी आला. तेव्हा टायर फुटून रस्त्यावरील दुभाजक फोडून पुणेकडील मार्ग सोडून सातारा दिशेकडील मार्गावर येऊन पलटी झाला. सुदैवाने सातारा दिशेने कोणतेही वाहन येत नव्हते. या अपघातात वाहनाचालकाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकची डिझेल टाकी फुटून त्यामधील डिझेल रस्त्यावर होते. त्यामुळे रस्त्यावरुन इतर वाहने जाताना घसरून पडू लागली होती. अपघाताची माहिती भुईंज पोलीस स्टेशनला झाल्यानंतर टोल नाक्यावर असणारे वाहतूक पोलीस पवार बोरसे यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवून सेवा रस्त्याने वाहतूक सुरु केली.
या ठिकाणी अगोदरही अनेकदा टायर फुटून मोठे गंभीर अपघात घडले आहेत. मात्र रस्ते विकास महामंडळ कोणत्याही प्रकारे या ठिकाणी लक्ष्य देत नसल्याचे दिसत आहे. त्यात या ठिकाणी पुढील बाजूस कमी लेनचा अरुंद पूल असल्याने भरधाव आलेले वाहन तो पूल पाहून अचानक ब्रेक लावल्याने अपघात घडत आहेत.