मोहन मस्कर-पाटील - सातारा - ‘माण’ वगळता उर्वरित ठिकाणी भावी आमदार ऊसदरच ठरविणार आहे. आमदारकीसाठी नशीब आजमावणारे सात उमेदवार साखर कारखान्याशी संबंधित आहेत. परिणामी तेथे ऊसदराचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येऊ लागला आहे. ‘स्वाभिमानी’ने ऊसदराचा विषय कळीचा मुद्दा केला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र या विषयावर पूर्णत: शांत आहेत. विशेष म्हणजे तीन आजी अ्न दोन माजी आमदार तसेच अन्य दोन उमेदवार साखर कारखान्यांशी संबंधित आहेत.‘कोरेगाव’च्या मैदानात नशीब आजमावणारे उमेदवार कारखान्याशी संबंधित नसलेतरी ‘जरंडेश्वर’च्या खासगीकरणाचा मुद्दा काँग्रेसच्या प्रचारात आहे. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी साखरपट्ट्यात उसदर हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविल्यामुळे साखर कारखान्यांशी संबंधित उमेदवारही ‘अस्वस्थ’ आहेत. ‘अजिंक्यतारा’ कारखान्याचे सर्वेसर्वा शिवेंद्रसिंहराजे भोसले ‘सातारा-जावळी’तून नशीब आजमावत आहेत. येथील लढत आरोप प्रत्यारोपांनी गाजू लागली आहे. स्थानिक मुद्दाही येथे महत्त्वाचा ठरला आहे. कारखान्याच्या अनुषंगाने मात्र प्रचाराचा मुद्दा कोणी केलेला नाही.‘सह्याद्री’चे सर्वेसर्वा बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात ‘कऱ्हाड उत्तर’मध्ये ‘स्वाभिमानी’चे मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे धैर्यशील कदम यांनी रान उठविले आहे. ऊसदराचा विषय आणि तोडणी वेळेवर होत नसल्याची सभासदांची तक्रार असल्याचा दावा कदम आणि घोरपडे यांनी केल्याने येथील लढत रंगतदार आहे.पारंपरिक लढतीच्या ‘पाटण’मध्ये सत्यजितसिंह पाटणकर विरुध्द देसाई कारखान्याचे सर्वेसर्वा शंभूराज देसाई यांच्यात लढत आहे. कारखान्याच्या कार्यक्षमतेच्या अनुषंगाने येथे स्वत: शरद पवारांनी उपरोधिक टीका केली आहे. दराच्या अनुषंगाने ‘स्वाभिमानी’ने देसार्इंच्या सातारा निवासस्थानी ठिय्या आंदोलनही केले होते. दोन कार्यान्वित आणि एका प्रस्तावित कारखान्याची सत्ता ताब्यात असलेले मदन भोसले वाईतून नशीब आजमावत आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वात कमी दर ‘किसन वीर’ आणि ‘प्रतापगड’ या दोन कारखान्यांनी दिला असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.खासगी कारखानदारही आमदारकीच्या फडातआमदारकीच्या फडात खासगी साखर कारखानदारही उतरले आहेत. तासगावचे डॉ. नंदकुमार तासगावकर शिक्षणसम्राट असलेतरी ते फलटण येथे ‘शंभू महादेव’ कारखाना उभारत आहेत. यामुळेच त्यांचा या भागाशी संपर्क आला आणि फलटण राखीव असल्यामुळे त्यांनी शड्डू ठोकला. काँग्रेसी विचारधारा जोपासलेले रणजितसिंह देशमुख ‘माण’मधून शिवसेनेकडून लढत आहेत. ते पिंगळी येथे ‘माण-खटाव शुगर अँड पॉवर’ हा प्रकल्प उभारत आहेत. त्यांची सुतगिरणीही जोरात सुरु आहे. विरोधकांच्या रडारवर ‘रयत’‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये काँग्रेसचा ‘हात’ शाबूत ठेवणारे विलासराव पाटील-उंडाळकर अपक्ष उमेदवार असून त्यांचा ‘रयत’ कारखाना खासगी उद्योगसमूहाकडे आहे. मात्र, त्यांनी अजूनही पहिला हप्ता दिला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक दर देणारा ‘कृष्णा’ उंडाळकरांसमवेत आहे.
साखरेचा ‘गोडवा’च म्हणे ठरविणार भावी आमदार!
By admin | Published: October 07, 2014 10:45 PM