कुडाळ : पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्याची संख्याही जास्त आहे. कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पेलणारा ऊसतोड मजूर मात्र वर्षानुवर्षे संघर्षमय जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनसंघर्षाला पूर्णविराम मिळून त्यांच्या व्यथा कोण जाणणार. अजूनही जगण्यासाठी अशीच परवड होत राहणार, अशी वेदनायी व्यथा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
निसर्गाची नेहमीच अवकृपा होत असलेल्या बीड, उस्मानाबाद, नगर, लातूर आदी जिल्ह्यांतून हे मजूर कुटुंबासह ऊसतोडणीसाठी येत असतात. कारखान्यांचा आवारात अथवा ज्या भागात ऊसतोडणी सुरू आहे, अशा ठिकाणी आपली झोपडी उभारून तात्पुरता संसार थाटतात. ऊसतोडणीसाठी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचे काम सुरू असते. कुटुंबातील महिलावर्गाची त्यात मोठी साथ मिळते. उसाच्या फडात वाडे बांधणीचे काम त्या करत असतात. लहान लेकरांना बरोबर घेऊन शेतातच बांधावर साडीच्या छोट्याशा पाळणात त्यांचा सांभाळ होत राहतो. या वेदनादायी संघर्षमय परिस्थितीतच त्याचा दिवस व्यथित होत असतो. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, विंचवा काट्याचे भय त्यांना कधी वाटतच नाही. उसाच्या फडातच ती लहानाची मोठी होतात. कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटे यांचा दिवस सुरू होतो. कोयत्याची पाती हातात घेऊन फडात साऱ्यांची लगीनघाई सुरू होते. आर्थिक परिस्थितीअभावी आगामी उचल अगोदरच घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो. वर्षातील काही दिवस गावी तर काही दिवस कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये अपरिमित हानी होते. आपल्या वस्तीवर ही मुले एकटीच बागडत असतात. अशातच कारखान्यावर सुरू असणाऱ्या साखरशाळाही आता शासनाने बंद केल्या आहेत.
कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही पोटाची खळगी भरण्यासाठी हा ऊसतोड मजूरवर्ग ऊसतोडणीसाठी झटत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तोडून बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमध्ये भरायचा आणि कारखान्यांपर्यत पोचवायचा. यामध्ये त्यांची सुरक्षा मात्र रामभरोसेच असते. गेली कित्येक वर्षे त्यांचा जीवनप्रवास असाच सुरू आहे. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी संपणार, त्याच्या व्यथांवर फुंकर कोण घालणार, हा प्रश्नच आजही तसाच अनुत्तरित आहे.
चौकट :
शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे...
ऊसतोड कामगारांच्या व्यथा समजावून घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. शासन आणि कारखान्यांनी त्यांच्या कुटुंब, मुलांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. याकरिता नियोजनपूर्वक कार्यक्रम राबविला पाहिजे.
कोट :
आमचा भाग दुष्काळी असल्याने पाण्याअभावी शेती फारशी पिकत नाही. यामुळे उदरनिर्वाहासाठी ऊसतोडणी करावी लागत आहे. दसऱ्यापासूनच आम्ही या भागात आलो आहे. कारखाना सुरू होईपर्यंत मिळेल ते काम करून कुटुंब चालविले आहे. कोरोनामुळे मुलेही आमच्याबरोबच आहेत. आमचा हा संसार असाच उघड्यावर मांडलेला आहे.
-शिवाजी माने, ऊसतोडणी कामगार
०३कुडाळ
फोटो : जावळी तालुक्यात ऊसतोडणी कामगार आभाळाच्या छताखाली आपला संसार मांडून आहेत. (छाया : विशाल जमदाडे)