माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रभाग आठचे नगरसेवक व बांधकाम सभापती किरण पवार यांच्या फंडातून गणेश रहाटे, सिध्दार्थ कॉलनी ते तहसील कार्यालय परिसरात रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. तसेच प्रभाग नऊच्या नगरसेविका प्राजक्ता भिसे यांच्या फंडातून तहसील कार्यालय ते देसाई महाविद्यालयापर्यंत रस्ता डांबरीकरणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
गत अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले होते. रस्त्यालगतच तहसील कार्यालय, इतर शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये असल्याने रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी व वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, रस्त्याचे काम सुरू झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. हे काम चांगल्या प्रतीचे आणि दर्जेदार होण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष स्वत: रस्त्यावर उतरून पाहणी करत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या डांबरीकरण कामाची नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र राऊत यांनी पाहणी केली. तसेच संबंधित ठेकेदारास योग्य त्या सूचना करून रस्त्याचे काम दर्जेदार करण्यास सांगितले.
फोटो : १७केआरडी०५
कॅप्शन : पाटण नगरपंचायतीच्यावतीने शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची नगराध्यक्ष अजय कवडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.