सातारा : सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सातारा विकास आघाडीचे सुहास राजेशिर्के यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाब व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.सातारा पालिकेमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. नगराध्यक्षा माधवी कदम आहेत. तर उपनगराध्यक्ष म्हणून राजू भोसले यांची निवड करण्यात आली होती. राजू भोसले यांनी एक वर्षे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सातारा विकास आघाडीतून अनेकजण उपनराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. यापूर्वी सुहास राजेशिर्के यांनी पाणीपुरवठा सभापती म्हणूनही काम पाहिले होते.
साताऱ्यातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात त्यांना यश आले. या कामाची पोहोच पावती म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे नाव उपनगराध्यक्षपदी निश्चित केले होते. या संदर्भातील वृत्त लोकमतने सगळ्यात अगोदर प्रसिद्ध केले होते. ते अखेर तंतोतंत खरे ठरले.
पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात गुरुवारी उपनगराध्यक्ष निवडीसाठी सर्वसाधरण सभा बोलविण्यात आली होती. या सभेत सुहास राजेशिर्के यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.