लोकमत न्यूज नेटवर्क सणबूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर स्वत: राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मंद्रुळकोळे-जौंजाळवाडी (ता. पाटण) येथे सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कल्पना किसन चोरगे (वय ४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या किसन शंकर चोरगे याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जौंजाळवाडी येथील शिवाजी जौंजाळ हे सोमवारी दुपारी जनावरे चारण्यासाठी शिवारात गेले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते शिवारातून परत घरी आले. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ते घरामध्ये बसलेले असताना सूर्यकांत पाटील हा मुलगा ओरडतच शिवाजी यांच्या घरासमोर आला. शिवाजी यांनी बाहेर येऊन त्याच्याकडे विचारणा केली असता, नजीकच राहणारा किसन चोरगे हा पत्नी कल्पना हिला लाकडी दांडक्याने मारहाण करीत असल्याचे सूर्यकांतने सांगितले. त्यामुळे शिवाजी धावतच त्याठिकाणी गेले. त्यावेळी कल्पना घरासमोरील अंगणात निपचित पडल्याचे दिसल्या. मात्र, किसन त्याठिकाणी नव्हता. त्यामुळे शिवाजी यांनी तातडीने त्याच्या घराकडे धाव घेतली. मात्र, किसनने दरवाजाला आतून कडी घातली होती. शिवाजी व सूर्यकांत या दोघांनी लाथा मारून दरवाजा तोडला. दोघांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, किसनने तुळईला गळफास घेतल्याचे दिसून आले. मात्र, तो जिवंत असल्यामुळे शिवाजी व सूर्यकांत यांनी दोर सोडवून त्याला खाली उतरविले. तोपर्यंत परिसरातील ग्रामस्थही त्याठिकाणी जमा झाले. ग्रामस्थांनी तातडीने खासगी गाडीने किसनला उपचारार्थ ढेबेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सातारच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाजी जौंजाळ यांनी या घटनेबाबत ढेबेवाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथील पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याबाबत शिवाजी जौंजाळ यांनी ढेबेवाडी पोलिसांत किसन चोरगे याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. किसनने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी कल्पना हिला लाकडी दांडक्याने मारहाण करीत तिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे तपास करीत आहेत. ----- मुलगा, मुलगी मुंबईत किसनचे मूळ गाव गलमेवाडी (ता. पाटण) असून जौंजाळवाडी हे कल्पनाचे माहेर आहे. कल्पनाला भाऊ नसल्यामुळे ते दोघे विवाहानंतर वतनावर जौंजाळवाडी येथे राहण्यास आले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून मुलीचा विवाह झाला आहे. ती पतीसोबत मुंबईत राहते, तर मुलगा स्वप्निल हासुद्धा कामानिमित्त मुंबईतच वास्तव्यास आहे. जौंजाळवाडी येथील घरात कल्पना व किसन हे दोघेच राहत होते.
पत्नीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: June 21, 2017 12:40 AM