सातारा : सातारा शहरातील अण्णासाहेब कल्याणी शाळेसमोरील ओढ्यातील झाडाला एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, संबंधिताने कोरोना बाधितमुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पण, संबंधितांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य इमारतीच्या जवळ अण्णासाहेब कल्याणी शाळा आहे. या शाळेच्या समोर ओढा असून तेथील करंजाच्या झाडाला तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर याबाबत सातारा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह खाली उतरविला. मृत तरुणाचे वय अंदाजे ३९ च्या दरम्यान आहे. त्याच्या अंगावर पांढरा टी-शर्ट होता तर उंची ५.५ फूट आहे. पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणाने कोरोना बाधित झाल्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची तसेच त्याबाबत चिठ्ठी सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, मृत तरुणाची कोरोना चाचणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.