लोणंद : खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील विवाहित महिलेने गुजरात येथे आत्महत्या केली होती. सासरच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला असून, कोपर्डी येथे सासरच्या घरासमोरच मुलीच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोपर्डे येथील चंद्रशेखर शिंदे, मयुरी शिंदे हे पती-पत्नी गुजरात येथील नवसारी या ठिकाणी नोकरीनिमित्ताने वास्तव्यास होते. चंद्रशेखरची पत्नी मयुरी ही बारामती तालुक्यातील पणदरे येथील असून, काही दिवसांपूर्वी तिने गुजरात येथे आत्महत्या केली होती. लग्नात मानपान, तसेच सोने कमी दिले म्हणून २०१६ पासून मयुरीचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू होता. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी गुजरात येथील पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरे उत्तमराव शिंदे, सासू बेबी शिंदे, नवरा चंद्रशेखर शिंदे, प्रशांत शिंदे, नणंदा संगीता भोसले, स्वाती काकडे, मंगल कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केल्यानंतर मयुरीचा मृतदेह शुक्रवारी माहेरच्या मंडळींनी कोपर्डे येथे आणला होता.
येत्या आठ दिवसांत लग्नात दिलेले सोने परत करणार व शेतजमिनीवर वारस म्हणून मुलाचे नाव लावणार, अशी कबुली पोलिसांसमोर चंद्रशेखर शिंदे यांनी दिल्यावर जमाव शांत झाला. मयुरीच्या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप करीत मयुरीच्या सासरच्या घरासमोरच तिला अग्नी देण्यात आला.
या दोन्ही बाजूकडून काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली होती. मुलीकडील नातेवाइक आक्रमक झाले होते. मात्र, लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून हे प्रकरण शांततेने हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
180921\img-20210918-wa0038.jpg
सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या..