वडूज : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी पती व सासू-सासऱ्यांच्या विरोधात मयत विवाहितेचे वडील लाला गोविंद शिंदे (रा. भालवडी ता. माण) यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर वडूज पोलिसांनी पती व सासऱ्याला अटक केली आहे. सारिका विशाल बागल (वय २९, रा. डांभेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, मयत सारिका व विशाल बागल यांचा १३ नोव्हेंबर २००० रोजी विवाह झाला होता. सारिका हिला श्रेयश्री, ध्रुवा या दोन मुली व शिवम् हा लहान मुलगा आहे. लग्नानंतर तिचा संसार काही दिवस ठीक चालला. मात्र, काही वर्षांनंतर सासू छबूताई व सासरे लालासाहेब हे तिला ‘तुला घरातील कामे नीट येत नाहीत. मुले व्यवस्थित सांभाळत नाहीस’ या कारणावरुन टोचून बोलत होती. हा सर्व प्रकार माहेरी आल्यानंतर तिने अनेकवेळा सांगितला होता. मात्र, आई-वडिलांनी तिची समजूत काढून परत पाठवले होते. काहीवेळेला माहेरहून शेतीसाठी पैसे घेऊन येण्याच्या कारणावरुन सारिका हिला मारहाण व शिवीगाळ केली जात होती. त्याचबरोबर अनेकवेळा तिला उपाशीही ठेवले जात होते. तर पती विशाल हे वडूजला जातो, असे सांगून चार-चार दिवस घरातून गायब होत असे. याबाबत विचारणा केली असता, ‘तुझी आता मला गरज नाही, तू निघून जा’ असे पतीकडून सांगितले जायचे. या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून सारिका हिने २२ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्यापूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर अधिक तपास करत आहेत.