लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील प्रेमीयुगलांनी तालुक्यातील कण्हेर जलाशयात आत्महत्या केली असून दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर पोलिसांना धरण जलाशयाजवळ मुलाचा मोबाईल, गाॅगल तर मुलीची दुचाकी आढळून आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा तालुक्यात कण्हेर धरण आहे. या धरणात ज्योत्स्ना कुमार लोखंडे (वय २५, रा. शुक्रवार पेठ, सातारा) आणि अरबाज इब्राहिम देवानी (वय २५, रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी आत्महत्या केली. हे दोघेही बेपत्ता होते. कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. तरीही ते आढळून आले नाहीत.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास कण्हेर जलाशयावर एका मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे काहींना दिसून आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले. तर जलाशयाजवळ मुलीची दुचाकी आणि मुलाचा मोबाईल व गॉगल आढळला. मुलीचा मृतदेह काढळल्यानंतर त्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर युवकाचा मृतदेह शोधणे पोलिसांनी सुरु केले. सायंकाळी मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आदींनी भेट दिली. पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
नातेवाईकांकडून माहिती घेण्यात येणार...
कण्हेर जलाशयातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांच्या अंगावर कोठेही जखमा आढळून आल्या नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईकांकडे चाैकशीसाठी संपर्क साधला. पण, काहीही माहिती देण्यात आली नाही. दोन दिवसानंतर पुन्हा नातेवाईकांकडे चाैकशी करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"