दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: शहराला हादरून टाकणाऱ्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या असून, आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी पाठोपाठ आत्महत्या केल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण पोलिसांना समजले नसून, पोलिस घरातल्यांकडे चाैकशी करत आहेत.
अथर्व बसवराज दोडमणी (वय १४, रा. सह्याद्री पार्क, शाहूपुरी, सातारा), जितेंद्र जगन वासकळे (वय १५, रा. चंदननगर, कोडोली, सातारा) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जितेंद्र वासकळे हा शहरातील एका शाळेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्याने त्याच्या खोलीमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रात्री साडेअकरा वाजता घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. त्याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. त्याचे वडील एका कंपनीत नोकरी करतात, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अथर्व दोडमणी हा सुद्धा साताऱ्यातील एका शाळेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्याने घरात नाष्टा केल्यानंतर तो बाहेर निघून गेला. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या बंगल्याशेजारी असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेतल्याचे घरातल्यांच्या निदर्शनास आले. यानंतर एकच खळबळ उडाली. अथर्वचा गळफास सोडवून त्याला तातडीने घरातल्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अथर्व हा तापट स्वभावाचा होता. त्याच्या मनासारखे झाले नाही तर तो चिडायचा, असं पोलिस सांगतायत. परंतु त्याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे समोर आले नाही. सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे.