सातारा : थोरल्या भावासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून धाकट्या भावाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शाहूपुरीतील सोमवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास भररस्त्यात घडली. संतोष जयसिंग शिंदे (वय ३६, रा. शाहूपुरी, शिवाजीनगर, सातारा) असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत संतोष शिंदे आणि त्यांचा थोरला भाऊ गणपत जयसिंग शिंदे (वय ४६) यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद होत होते.
हा वाद न्यायालयातही सुरू आहे. याची सोमवार, दि. ९ रोजी तारीखही होती. दरम्यान, सोमवारी सकाळी पुन्हा याच कारणावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतोष शिंदे यांनी संतापाच्या भरात स्वत:जवळ असलेल्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भररस्त्यात हा प्रकार घडल्याने शाहूपुरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली. संतोष शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. काहींनी या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली.
पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संतोष शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. संतोष शिंदे हे मुंबई येथे रियल इस्टेटचा व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना होता की नाही, हे अद्याप समोर आले नसून पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.