सातारा : येथील शाहूपुरीमधील सरस्वती कॉम्पलेक्समध्ये वास्तव्यास असणाऱ्या यश दिलीप गिरमकर (वय १५) या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक असणाऱ्या यशच्या मृत्यूमुळे गिरमकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोळला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यश गिरमकर हा मुळचा मुंबई येथील रहिवाशी आहे. त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे तो शाहूपुरीतील त्याच्या वडिलांच्या बहिणीकडे पाचवीपासून राहात होता. नववी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सुटीमध्ये खासगी क्लासही लावले होते.
शहरातील एका इंग्रजी माध्यमच्या शाळेत तो शिकत होता. शुक्रवारी रात्री त्याने त्याच्या अत्त्याला ढोकळा खायचा आहे, असा हट्ट धरला. त्यामुळे त्याच्या अत्त्याने त्याला ढोकळा खायला दिला. काही वेळानंतर तो अभ्यासासाठी म्हणून त्याच्या खोलीत गेला. मात्र, बराचवेळ झाला तरी तो खोलीबाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या अत्त्याने दरवाजा ठोठावला असता आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांना बोलविल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता यशने ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.यशने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नसून पोलीस त्याच्या वडिलांकडे आणि अत्त्याकडे चौकशी करत आहेत. येत्या १६ जूनला यशचा वाढदिवस होता. या वाढदिवसासाठी त्याचे वडील मुंबईहून साताऱ्यात येणार होते. दहावीमध्ये चांगली टक्के मिळवलीस की, तुला गाडी आणि मोबाईल घेणार, असे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते. त्याने तशी तयारी दर्शवून अभ्यासही सुरू केला होता. असे असताना त्याने टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न त्याच्या वडिलांसह गिरमकर कुंटुबाला पडला आहे.यशचा कोर्टाकडून ताबा !यशच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी यशचा न्यायालयाकडून ताबा घेतला होता. आईचे प्रेम त्याला मिळालेच नाही. अत्या हीच त्याची आई होती. लहानपणापासून तो फारसा कोणाशी बोलायचाही नाही. एकटे राहणे तो पसंत करत होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.