सातारा : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले हवालदार राजेंद्र भिवा मोरे (वय ५५, रा. पांडे, ता. वाई) यांनी शेंदूरजणे, (ता. कोरेगाव) येथील सासूरवाडीमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप पोलिसांना समजले नाही.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र मोरे हे मुंबई येथील विलेपार्ले पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. तर मुंबईतील कळंबोली येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी ते सुटीवर गावी आले होते. दोन दिवसांपासून ते शेंदूरजणे येथे सासूरवाडीत वास्तव्यास गेले होते. मंगळवारी (दि. १३) दुपारी एक वाजता ते एकटेचशेतात गेले. या ठिकाणी त्यांनी दारूतून विषारी औषध प्राशन केले. मात्र, त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर नातेवाइकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील पोलिसांना त्यांनी चुकून हा प्रकार केला असल्याचे सांगितले होते. दरम्यान, बुधवारी पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.घरगुती की अन्य कारणातून हवालदार मोरे यांनी आत्महत्या केली, याबाबत पोलिस नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत.
मुंबईच्या हवालदाराची सासूरवाडीत आत्महत्या
By admin | Published: June 14, 2017 10:49 PM