खंडाळा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी थंडी जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागत आहेत.
कचऱ्यामुळे दुर्गंधी
सातारा : येथील समर्थ मंदिर ते पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात लोकांकडून ओला कचरा टाकण्यात येत आहे. खराब अन्नपदार्थ, मृत जनावरे, आदी कचरा ओढ्यात टाकला जात असल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करून खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे.
दुभाजकांत गवत वाढले
सातारा : शहरातील मुख्य रस्त्यांमध्ये असलेल्या दुभाजकातील गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या गवताकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेच्यावतीने गवत काढण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हे गवत वाळल्यास शहराच्या सौंदर्याला बट्टा लागत आहे.
दुचाकी चोऱ्यांत वाढ
फलटण : परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे. तसेच शहर व परिसरात बेवारस दुचाकी आणि चारचाकी सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास
सातारा : सातारा शहरातील शेटे चौकात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाशेजारी आसपासचे नागरिक कचरा आणून टाकतात. त्यानंतर हा कचरा या कुत्र्यांकडून विस्कटला जातो.
अस्ताव्यस्त वाहनांमुळे पार्किंगची समस्या
सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे इतर वाहने काढताना अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा परिषदेसमोर दुचाकीसाठी पार्किंग आहे. या ठिकाणी नोकरदार दुचाकी लावतात. तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्या असतात; पण अनेकवेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही.
आरोग्याची काळजी
सातारा : सध्या वातावरणात बदल झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. सध्या साथरोगांचा त्रास काही लोकांना जाणवू लागला असून, त्यापासून बचाव करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांना दिला जात आहे.
कोरोनाची भीती
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या कमी होती. मात्र, सध्या नव्याने काही गावांमध्ये कोरोनाचे संक्रमण दिसून येऊ लागले आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढू लागली आहे.
करंजे परिसरातील पुलाकडेला कचरा
सातारा : करंजे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. काचेच्या बाटल्या, थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, बॉटल आदींसह खाद्यपदार्थ कचऱ्यामध्ये पडत असल्याने त्यातून दुर्गंधी येत आहे. येथे नेहमीच प्रत्येक प्रकारचा कचरा टाकण्यात येतो. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून पुलाकडेला कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.