सातारा : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ३ ते २१ मार्चअखेर राबविण्यात येणार आहे. या कालावधीत पालकांनी आपल्या पाल्याचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन प्राथमिकचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी केले आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
बसस्थानकात कारवाई करा
सातारा : मध्यवर्ती बसस्थानकातील अडचणींचा फेरा काही केल्या संपत नाही. शिवशाही बस पेटल्याची घटना अद्यापही ताजी आहे. त्यातच आऊटगेट व इन गेटवरील अडथळे कायमच असतात. आता या बसस्थानकात खाजगी वाहनांची मोठी वर्दळ होऊ लागली आहे. कित्येकदा खाजगी वाहनांमुळे बसस्थानकात अपघाताचे प्रकार घडत असून याकडे एसटी प्रशासन कानाडोळा करत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
कोरोनाची शाळेत घुसखोरी
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शैक्षणिक क्षेत्रातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १२ विद्यार्थी व ६ शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत.
महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा
सातारा : गेल्या काही दिवसांत सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर भीषण अपघात झाले आहेत. कऱ्हाड पट्टा व वेळे, खंडाळा परिसर येथे झालेल्या अपघातांनी महामार्गावरील प्रवास धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून वाहनांचा वेगच अनेक अपघातांना कारणीभूत ठरला आहे.
कुसुमाग्रजांच्या आठवणी जागवल्या
सातारा : येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय सातारा येथे कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. साताऱ्यातील लेखक आणि वाचनालयाचे संचालक डॉ. राजेंद्र माने, वाचनालयाचे कार्यवाह डॉ. शाम बडवे, डॉ. ज्योत्सना कोल्हटकर, संचालक प्रदीप कांबळे, वैदेही कुलकर्णी, पद्माकर पाठक उपस्थित होते.
वाखरीत परिसरात गहू काढणी
सातारा : फलटण तालुक्यातील ढवळ, वाखरी व तालुक्याच्या कॅनाॅल पट्ट्यात गव्हाच्या काढणीस वेग आला आहे. यंत्राच्या साहाय्याने काढणीचा धूमधडाका सुरू असून यंदा रबी हंगामातील अन्य पिकांपेक्षा फलटण तालुक्यात गव्हाचे पीक विक्रमी उत्पादनाने निघत आहे. यंदा गव्हाच्या पिकाच्या पोषणासाठी वातावरण चांगले होते.