तरडगाव : उन्हाळ्यात हंगामी व्यवसाय करणारे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अडचणीत आले आहे. विस्कटलेली आर्थिक घडी बसविताना या व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्यात रसवंतीगृह, शीतपेयाची दुकाने, कलिंगड व माठ विक्री करणारे तसेच फिरून हातगाड्यावर आइस्क्रीम विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यातच ऐन हंगामात लॉकडाऊन सुरू झाला होता. ऑक्टोबरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. यामुळे पुढील येणारा उन्हाळी हंगाम चांगला जाईल, अशी आशा व्यावसायिकांना होती. काहींनी तर यावर्षी फेब्रुवारीपासूनच हंगामाची जोरदार तयारी सुरू केली. दरम्यान, अनेकांनी व्यवसाय सुरूदेखील केले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येताच व्यावसायिकांच्या आशेवर पाणी फिरले.
तालुक्यात मार्च ते मे या तीन महिन्यांत अनेकजण हंगामी व्यवसाय करतात. या काळात मिळणाऱ्या उत्पन्नातून पुढील नऊ महिन्यांसाठी आर्थिक तजवीज करून ठेवली जाते. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे सर्व व्यवसाय बंद राहिल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
(चौकट)
व्यावसायिकांनी पत्करली माेलमजुरी
उन्हाळा म्हटलं की लग्नसराई ही आलीच. यावर अनेक व्यवसाय अवलंबून असतात. मंगल कार्यालये, मंडप, वाजंत्री, आचारीवर्ग, आरो प्लांट आदींची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, लग्न समारंभास अनेक नियम लागू केल्याने हे सोहळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व कमी खर्चात जास्त गाजावाजा न करता होऊ लागले. यामुळे यावर अवलंबून असलेले व्यवसाय अडचणीत आले आहेत. बिकट परिस्थिती निर्माण झालेले छोटे व्यावसायिक तर इतरत्र मोलमजुरी करताना दिसत आहेत.
फोटो :