................
खरीप हंगाम तयारी
दहिवडी : माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. यासाठी जमीन मशागत करण्यात येत आहे. रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतकरी जमिनीची नांगरणी करतात, तसेच खत ओढून विस्कटणी करण्यात येते. सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करताना दिसून येत आहेत. वळवाचा पाऊस झाल्यानंतर शेतकरी बियाण्याची तयारी करतो. पाऊस वेळेत पडण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
..........................
विहिरींनी गाठला तळ
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे उन्हाळी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या परिसरातील शेतकरी भुईमूग, कडवळ पीक घेतो. यंदा अनेक शेतकऱ्यांनी हे पीक घेतले आहे, पण सध्या पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पीक करपत चालले आहे. वळवाचा एखादा चांगला पाऊस पडला, तर पिकांना फायदा होणार आहे.
.......................
लॉकडाऊनचा फटका
सातारा : कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. यामुळे फळ आणि भाजी विक्रेत्यांना फटका बसू लागला आहे. किरकोळ विक्रेते दररोज मालाची खरेदी करून त्याची हतगड्यावरून विक्री करतात, पण सोमवारी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, तसेच त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना माल खपविण्यासाठी काहीच करता आले नाही. काहींनी पोलिसांची नजर चुकवून बोळात जाऊन भाजी, तसेच फळांची विक्री केली.
....................................
साताऱ्यात ढगाळ वातावरण
सातारा : सातारा शहरात दोन दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस झाला, पण सध्या ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाडा कमी झाला आहे. मागील काही दिवसांपासून सातारा शहर व परिसरात वळवाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. परिणामी, पाऊस पडत नसला, तरी उकाडा कमी झाला आहे. अजून काही दिवस ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे.
...................................................