महाबळेश्वर : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वर ऐन उन्हाळ्यातही थंड असते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरचे तापमानही वाढत असते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता.सकाळी वेण्णा लेक परिसरात झाडांच्या पानांवर साचलेल्या हिमकणांचे फोटो काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती. सर्वच ऋतूंमध्ये महाबळेश्वर देशभरातील पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन असते.
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राचा पारा चढला असताना महाबळेश्वर मात्र गारेगार असते. होळीनंतर उन्हाचा तडाखा वाढतो. पर्यायाने महाबळेश्वरचेही तापमान वाढते. गेल्या पंधरा दिवसांत उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला आहे. परंतु असे असतानाही काल मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीचा तडाखा अचानक वाढला.सकाळी येथील वेण्णा लेक परिसरातील अनेक झाडांच्या पानांवर गोठलेले दवबिंदू साचल्याचे स्थानिकांसह पर्यटकांना दिसल्यामुळे पर्यटकही खूश झाले. अनेकांनी हा नजारा मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. भल्या सकाळपासून हे फोटो परस्परांबरोबरच सोशल मीडियावरही शेअर करण्यात हे पर्यटक अग्रभागी
दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर
सर्वत्र उन्हाळी हंगामातील उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अतिशय अल्हाददायक वातावरण अनुभवायास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात आज भल्या पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर ठिकठिकाणी शेती व स्ट्रॉबेरी मळ्यामधे पाहावयास मिळाली. या परिसरात ४-५ अंश डिग्री पारा खाली उतरला होता. या निसर्गाच्या आविष्काराचा आनंद स्थानिकांसह पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला.
गेले २ दिवसापासून या नंदनवनातील सकाळ व रात्रीचे वातावरण अत्यंत अल्हाददायक होते. आज सकाळी तर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात प्रचंड थंडी होती. तेथील तापमान ४-५ अंश डिग्री खाली उतरले होते, त्यामुळे सर्वत्र या परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत,पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले. हिवाळ्यात अश्या प्रकारे हिमकण पाहावयास मिळत असतात मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसणे हे अत्यंत दुर्मिळ चित्रच म्हणावे लागेल. या वर्षी थंडीच्या मोसमामध्ये या नंदनवनात अनेक वेळा कडाक्याची थंडी पडली होती, मात्र त्या वेळेस जोरात वारेही होते, त्यामुळे हिमकण पहावयास मिळाले नाहीत. मात्र आज अशा प्रकारे हिमकण दिसल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वर शहराचे किमान तापमान सुमारे १०.० डिग्री सेल्सियस होते तर वेण्णा तलाव परिसरात ते ४-५ अंश डिग्री पेक्षा कमी असल्याचे जाणवत होते. दरम्यान ४ मार्च २०१५ रोजी व मागील वर्षी १३ मार्च २०१७ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण साजरा होत असतानाच अश्या प्रकाचे हिमकण महाबळेश्वर मध्ये पाहावयास मिळाले होते. त्याचाहि आनंद त्यावेळी स्थानीकांसह पर्यटंकांनी मनमुरादपणे लुटला होता.