सातारा : साताऱ्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी सुनील थोरवे यांची तर महसूल उपजिल्हाधिकारीपदी विद्युत वरखेडकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. जिल्ह्यातील इतर तहसीलदारांच्याही विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या बदलीचे आदेश शासनाने नुकतेच काढले आहेत. साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांची हवेली (पुणे) येथे प्रांताधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांना ठाणे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी आरती भोसले यांची पुणे उपजिल्हाधिकारी भूसंपादन म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद कोळी यांची सोलापूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे येथील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दौंड येथील प्रांताधिकारी संजय आसवले यांची साताऱ्यात भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील तहसीलदारांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. साताऱ्याचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांची पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी आशा होळकर यांची नियुक्ती करण्यात आली. खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांची पुणे येथे तर त्यांच्या जागी दशरथ काळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
फलटणचे तहसीलदार विजय पाटील यांची बारामतीला बदली झाली. त्यांच्या जागी बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील आले आहेत. कोरेगावच्या तहसीलदार स्मिता पवार यांची कुकडी प्रकल्प (पुणे) सहायक पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी शुभदा शिंदे यांची नियुक्ती झाली.
कऱ्हाडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची माढा तहसीलदार पदावर बदली झाली. त्यांच्या जागी भूदरगडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार अमिता तळेकर यांची पुणे येथे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी आजराच्या तहसीलदार अनिता देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाईचे तहसीलदार रमेश शेंडगे यांची पन्हाळा तहसीलदार म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी शिरुरचे तहसीलदार रणजित भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खटावच्या तहसीलदार जयश्री आव्हाड यांची सातारा येथे विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. अर्चना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रोजगार हमी योजना वाऱ्यावरसातारा जिल्हा रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांची आंबेगाव मंचर (पुणे) येथे प्रांताधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी शासनाने कोणाची नियुक्ती केली आहे, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. जिल्ह्यात माण, कोरेगाव, फलटणसह इतर तालुक्यांतही तीव्र दुष्काळाचे सावट आहे. रोजगार हमी विभागाच्या माध्यमातून दुष्काळी उपाययोजनांवर काम केले जाते. हा विभाग वाऱ्यावर सोडल्याचे पाहायला मिळते.