चाफळ : नाणेगाव बुद्रुक येथे महिलांच्या विशेष ग्रामसभेत शेकडो रणरागिनींनी सूर्याचीवाडी येथील दारूबंदीबाबत खणखणीत आवाज उठवत एकमुखाने निर्णय घेऊन ठराव संमत केला. दारू विक्रेत्यांची पंधरा वर्षांची मुजोरी मोडीत काढण्यात यश मिळाल्याने महिलांमध्ये चैतन्य पाहावयास मिळत आहे. नाणेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या कडववाडी येथे महिलांची ग्रामसभा पार पडली. माजी सरपंच राधाबाई मनोहर कडव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सभेस माजी सरपंच वैशाली बोंगाणे, शिवाजी जाधव, उपसरपंच विजय सुपेकर, जगन्नाथ घाडगे, नितीन मसुगडे, शोभा कवठेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला ग्रामसेवक माळी यांनी गत सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला. त्यानंतर ऐनवेळच्या विषयादरम्यान सूर्याचीवाडी, कवठेकरवाडी, कडववाडी येथील महिलांनी दारूबंदीबाबत आक्रमक पवित्रा घेत दारूबंदीची मागणी केली. त्यामध्ये तरुणांचाही सहभाग कमालीचा होता. अखेर सभेमध्ये दारूबंदीचा ठराव घेत, याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जगन्नाथ घाडगे यांनी उपस्थित महिलांना दिले. दारूबंदीच्या ठरावाच्या प्रती आमदार शंभूराज देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस यांना देण्याबाबत तत्काळ कारवाई करणार असल्याचे ग्रामसेवक माळी यांनी सांगितले. सभेस उज्ज्वला कवठेकर , संगीता कवठेकर, कमल हजारे, शकुंतला कवठेकर , कल्पना कवठेकर, अरविंंद कडव, मनोहर कडव आदींसह शेकडो महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)सूर्याचीवाडी येथे दारूबंदी करण्यासाठी महिला व तरुण सरसावल्याने तेथील दारूअड्डा बंद होईल. मात्र, कडववाडी येथील दारू अड्ड्याचे काय? असा प्रश्न उपस्थित करीत अनेकजण कडववाडी येथील दारू अड्ड्याबाबत चर्चा करत होते. कडववाडीतील दारू व्यावसायिकास समज देऊन संबंधित अड्डा बंद करण्यास भाग पाडावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.
सूर्याचीवाडीत अखेर बाटली आडवी
By admin | Published: February 01, 2015 10:34 PM