सातारा : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत. परिणामी जिल्ह्याच्या पूर्व भागाला टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश धरणे निम्म्यावर आली असून, काही धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. सद्य:स्थिती पाहता पुढील दोन महिन्यांत धरणे तळ गाठणार असून, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहेत. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम, नीरा-देवघर, भाटघर, तारळी आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. तसेच कूपनलिका, विहिरी, ओढे व तलावांमध्येही मुबलक पाणीसाठी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत. परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने माण, फलटण तालुक्यांत पाणी टॅँकर सुरू करून ग्रामस्थांना दिलासा दिला असला तरी पुढील दोन महिन्यांत पूर्व भागातील पाणीटंचाईचे चित्र अधिक भीषण होणार आहे.एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असताना दुसरीकडे धरणांंमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे. कोयना व उरमोडी धरण वगळता बहुतांश धरणे जवळपास निम्म्यावर आली आहेत. कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात पाणीसाठा जास्त असला तरी वीजनिर्मिती व शेतीसाठी पाण्याचा वापर पाहता पावसाळा सुरू होईपर्यंत दोन्ही बाबींसाठी पाण्याचा मेळ घालणे कोयना व्यवस्थापनापुढे आव्हान असणार आहे. (प्रतिनिधी)कोयनेत ६.९५ टीएमसी पाणीसाठा अधिक१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण गेल्या वर्षी जवळपास शंभर टक्के भरले. धरणात आजमितीस ४८.१४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याच दिवशी ४१.१९ टीएमसी पाणी शिल्लक होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.९५ टीएमसी पाणी अधिक आहे. धरणातील १३ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जाणार आहे. तर ६ टीएमसी पाणी सांगली लघू पाटबंधारे विभागाला वीज व शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. २३ टीएमसी पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील शेतीसाठी होणार आहे.
उन्हाची झळ; धरणे गाठतायत तळ
By admin | Published: March 24, 2017 11:37 PM