कऱ्हाड : शहरातील टोळीयुद्ध आणि बबलू माने खून प्रकरणात पोलिसांनी कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या टोळीभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पोलिसांनी सल्यासह पाचजणांच्या घरावर छापे टाकले. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे मंगळवारी दिवसभर कऱ्हाडात तळ ठोकून होते. शहरात पहाटेपासूनच राबविलेल्या विशेष मोहिमेत पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, राजेंद्र राजमाने, एस. के. म्हेत्रे, वडूजचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, फलटणचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप, दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हंडे, वाठार स्टेशनचे सहायक निरीक्षक शहाजी निकम, कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक पाटील व सहायक निरीक्षक समाधान चौरे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातून मंगळवारी पहाटे शहर व तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून घेण्यात आले. पहाटे एकाचवेळी सर्व पथके बंदोबस्तासाठी व छापासत्रासाठी रवाना झाली. त्यानंतर एकाचवेळी सर्व ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. टोळी युद्धानंतर कऱ्हाडातील गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते प्रस्थ अधोरेखित झाले. या टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मंगळवारचे छापासत्र हा या ‘अॅक्शन प्लॅन’चा पहिला टप्पा मानला जातो. (प्रतिनिधी)पोलीस पथके कऱ्हाडबाहेरील !कऱ्हाडात ज्या पथकांनी पाच घरांवर प्रत्यक्ष छापा टाकला, ती पोलीस पथके कऱ्हाडबाहेरील होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या पाच पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून संशयितांना स्थानबद्ध केले. तसेच त्यांच्या घरांची कसून झडती घेतली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या या पथकांमध्ये प्रत्येक पथकात एक अधिकारी व सहा पुरुष कर्मचारी तर दोन महिला पोलिसांचा समावेश होता. आणखी आरोपींचा सहभाग स्पष्टबबलू मानेच्या खून प्रकरणात सोमवारी पहाटे पोलिसांनी फिरोज बशीर कागदी (वय ३३, रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) याला अटक केली आहे. त्यानंतर मंगळवारी पहाटे ठिकठिकाणी छापे टाकून तिघांना अटक केली. या प्रकरणात आणखीही आरोपी निष्पन्न होणार असून, त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. तालुक्यात अफवांना ऊतगत आठवड्यापासून कऱ्हाडात तणावपूर्ण शांतता आहे. अशातच मंगळवारी पोलिसांनी सर्व ताकदीनिशी छापासत्र चालविले. ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. पहाटेपासून पोलिसांच्या सुरू असलेल्या या हालचालींची माहिती सोशल मीडियाद्वारे पसरली. त्यामुळे तालुक्यात अफवांना ऊत आला होता. वेगवेगळ्या चर्चाही रंगत होत्या. तिघांनाही पाच दिवस कोठडीकऱ्हाड पोलिसांनी मंगळवारी अटक केलेल्या इब्राहिम सय्यद, जावेद शेख व मोहसिन जमादार या तिघांना दुपारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तिघांनाही न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सोमवारी अटक केलेल्या फिरोज कागदी यालाही दि. १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.बारा तास पोलिसांची तपासणीपोलिसांनी सल्यासह पाचजणांच्या घरावर छापा टाकला. सुमारे बारा तास ही तपासणी सुरू होती. पोलिसांनी शस्त्रास्त्रे, रोख रक्कम, शिधापत्रिका, बँक खाते, मालमत्ताविषयक कागदपत्रे, मोबाइल सीमकार्ड, वाहनांची कागदपत्रे आदींची तपासणी यावेळी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक कऱ्हाडात तळ ठोकून
By admin | Published: July 28, 2015 10:05 PM