सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती अधिक वाढली असून सध्या १८० गावे आणि ७६० वाड्यांसाठी २१७ टँकर सुरू आहेत. जवळपास ३ लाख नागरिक आणि १ लाख ४१ हजार पशुधनाला या टँकरचाच आधार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माणमधील ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी पूर्व भाग मात्र, कोरडाच राहिला. सुरुवातीच्या काळात मान्सूनचा पाऊस झाला. पण, आॅगस्टनंतर पूर्व दुष्काळी भागात अपवादानेच पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच माण तालुक्यातील अनेक गावात टंचाईची स्थिती निर्माण झाली. तर नोव्हेंबर महिन्यापासून काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. जानेवारी महिन्यानंतर तर टंचाई स्थिती अधिक गडद होत गेली.माण तालुक्यातील सध्या ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना १०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १ लाख ३६ हजार २७६ नागरिक आणि ६१ हजार ६५७ पशुधन अवलंबून आहे. या तालुक्यासाठी टँकर खेपा २१९ मंजूर असल्या तरी रविवारी १८९ झाल्या. खटाव तालुक्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून ३९ गावे आणि १३५ वाड्यांसाठी ३५ टँकर सुरू आहेत.
तालुक्यातील ६७ हजार ४५ नागरिक आणि ३५ हजार ३०३ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तालुक्यात १ टँकर वाढला आहे. कोरेगाव तालुक्यातही टंचाईची स्थिती असून २८ गावांना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ४४ हजार ७३३ नागरिक व १९ हजार ८०६ पशुधन टँकरवर तहान भागवत आहे.फलटण तालुक्यातही टंचाई निर्माण होणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या तालुक्यातील २० गावे व ५५ वाड्यांतील ३४ हजार ३४५ ग्रामस्थ आणि १२ हजार ५८० पशुधनला टँकरचा आधार आहे. तालुक्यात २५ टँकरची चाके दुष्काळग्रस्तांसाठी धावत आहेत.
वाई तालुक्यात ८ गावे व ४ वाड्यांसाठी ६ टँकर सुरू आहेत. खंडाळा आणि पाटण तालुक्यात प्रत्येकी २ टँकर सुरू आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील ३ गावे आणि एका वाडीसाठी ३ टँकर सुरू आहेत. तसेच सातारा तालुक्यात १ व कऱ्हाड तालुक्यातील ३ गावांना टँकरचा आधार आहे.१११ विहिरींचे अधिग्रहण; खेपांची टक्केवारी ८६टंचाईच्या गावातील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी २१७ टँकर सुरू असून त्यामधील ९ शासकीय आहेत तर तब्बल २०८ हे खासगी आहेत. या टँकरना दररोज ४७५ खेपा मंजूर असल्यातरी रविवारी फक्त ४३४ झाल्या होत्या. खेपांची टक्केवारी ही ८६ टक्के इतकी आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात १११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.