सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीतही खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा मतदारसंघासाठी नाव जाहीर न झाल्याने समर्थक संतप्त झाले. याबाबत गुरुवार रात्री शासकीय विश्रामगृहात बैठक घेत राजीनामा देण्याचा इशारा दिला. मात्र, भाजपचे लोकसभा मतदारसंघ संयोजक सुनील काटकर यांनी शुक्रवारपर्यंत वाट पाहू व त्यानंतर आपण एकमताने निर्णय घेऊ, अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे कार्यकर्ते शांत झाले.
याबाबत माहिती अशी की, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघ कोणाच्या ताब्यात जाणार हे निश्चित नाही. अशातच भाजपने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही.
सातारा मतदारसंघ भाजपने घेऊन उदयनराजे यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे दोन याद्यांनंतरही उदयनराजेंचे नाव जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शासकीय विश्रामगरावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केले जाते. पण, त्यांच्या वंशजांना उमेदवारी डावलली जाते हे आम्ही सहन करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर सुनील काटकर यांनी तुमची मागणी रास्त आहे. तुमचा असंतोष बरोबर आहे. कारण, सातारा जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. तरीही आपण त्यांच्या उमेदवारीसाठी एक दिवस थांबावे. कारण, गुरुवारी दिवसभरात त्यांच्याशी अनेक वरिष्ठांनी बोलणे केलेले आहे. त्यामुळे कोणीही हवालदिल न होता शुक्रवारी आपण एकमताने भूमिका मांडू असे स्पष्ट केले.
भाजप जिल्हाध्यक्षांबरोबर पत्रकार परिषद
महायुतीत अजूनही लोकसभा मतदारसंघाचे वाटप सुरू आहे. याबाबत शुक्रवारी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सातारा मतदारसंघाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याबरोबर बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे सुनील काटकर यांनी या बैठकीत सांगितले.