सातारा : सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असून ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांना एक भेटवस्तू मिळणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हाणला. दरम्यान, निवडणुकीसाठी राज्याचे प्रकल्प गुजरातला पळवले. चार लाख लोकांचा रोजगार गेला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राच्या सांगण्यावरून गप्प बसल्याची टीकाही त्यांनी केली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, गुजरात निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यामुळेच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले. इथल्या चार लाख लोकांचा रोजगार गेला; परंतु केंद्राने बोलू नका, असे सांगितल्यानेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्री काही बोलले नाहीत. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आलीय, आता आमचे प्रकल्प आम्हाला परत द्यावेत. निवडणुकीमुळेच कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत.सध्याच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही आमच्याच सरकारची जुनी योजना आहे. योजना पारदर्शक कशी होईल, याची जबाबदारी शासनाने घ्यावी. मागच्या जलयुक्त शिवारमध्ये काही त्रुटी राहिल्या, तसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे पाटील म्हणाले.रोहित पवारांच्या विधानाची नितेश राणेंनी खिल्ली उडवत शक्ती कायदा झाला तर राष्ट्रवादीचेच तीन आमदार तुरुंगात जातील, असे म्हटले होते. याबाबत विचारले असता जयंत पाटलांनी त्यांच्या प्रत्येक विधानावर उत्तर द्यायची गरज नसल्याचे सांगत बगल दिली.सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात सरकारने दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात नाताळच्या सुट्याही येत आहेत. सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात आहे; परंतु जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडता आले पाहिजेत. यामुळे तीन आठवडे अधिवेशन सुरू राहण्यासाठी आग्रही असल्याचे पाटील यांनी सांगितले.सदावर्ते भाजपचे हस्तक गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे हस्तक आहेत. जे सत्ताधाऱ्यांना बोलता येत नाही, ते सदावर्ते यांच्या मार्फत बोलले जाते. सत्ताधारी त्यांचा वापर खुबीने कसा करतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तथापि, खासदार उदयनराजे भोसले यांचा सध्या संपर्क नसल्याचे सांगत ते राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत का नाहीत, यावर त्यांनी अधिक भाष्य टाळले.
ज्यांना मंत्रिपद नाही त्यांना भेटवस्तू नक्की, मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:49 AM