सातारा : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व खटाव काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी नियुक्तीचे पत्र डॉ. सुरेश जाधव यांना ई मेलने पाठविले आहे. दीर्घकाळापासून काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर प्रदेश कार्यालयाने डॉ. सुरेश जाधव यांची नियुक्ती केली आहे.डॉ. सुरेश जाधव हे १0 वर्षे खटाव तालुक्यातील पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. १९९७-९८ मध्ये त्यांनी खटाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. काँग्रेसचे खटाव तालुका प्रदेश प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन म्हणून त्यांनी ८ वर्षे काम पाहिले आहे. गेल्या १६ वर्षांपासून ते देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून २५ वर्षे त्यांनी काम केलेले आहे. गेल्या १५ वर्षांपासून खटाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
जिल्ह्यातील काँग्रेस वाढविण्यावर माझा भर राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्ह्यातील विकासकामांसाठी जेवढा जास्त निधी आणता येईल, तेवढा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काँग्रेस पक्षाशी सामान्य नागरिकांची नाळ पूर्वीपासूनच आहे. ती आणखी बळकट करणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व वाढविणार आहे.- डॉ. सुरेश जाधव, प्रभारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी