सातारा : जिल्ह्यातील १४९७ ग्रामपंचायतींमध्ये आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत दररोज केल्या जाणाऱ्या कोमॉर्बिड सर्वेक्षणांतर्गत कोरोनासदृश लक्षणे असलेले १९३६ रुग्ण आढळून आले. तसेच त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, सातारा जिल्ह्यात आशा व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून दररोज २५ ते ४० व्याधिग्रस्त नागरिकांचा सर्व्हे केला जात आहे. यामध्ये विविध लक्षणे असणारे नागरिक व ९४ पेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असणाऱ्या नागरिकांना शोधून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तत्काळ कोरोना चाचणी केली जात आहे.
मागील आठवड्यात झालेल्या सर्व्हेनुसार सातारा तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींमधील ७०३८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी २९९ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. कोरेगाव तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींमधील ४२९४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी २११ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. खटाव तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींमधील ४९११ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी ३९४ नागरिक कोरोनाबाधित आढळले.
माण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमधील ३११८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी ३०० नागरिक बाधित सापडले. फलटण तालुक्यात १३१ ग्रामपंचायतींमधील ५८६० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी १३२ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमधील १५० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १७ नागरिक तर वाई तालुक्यात ३०७२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ५४ नागरिक बाधित स्पष्ट झाले.
जावली तालुक्यातील ४१९३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर तपासणीत १०० नागरिक बाधित आढळून आले. महाबळेश्वर तालुक्यात ९०५ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १९ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. कराड तालुक्यातील २०० ग्रामपंचायतींमधील ४९३३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ३२३ नागरिक बाधित आढळून आले. पाटण तालुक्यातील २३४ ग्रामपंचायतींमधील ३९३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या तालुक्यात ८७ नागरिक कोरोनाबाधित सापडले. या सर्व्हेमुळे लवकर निदान झाले तसेच सर्वांवर योग्य वेळी उपचार सुरू झाले.
00000