लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील सदर बाजार, लक्ष्मी टेकडी परिसरात चिकनगुण्यासदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी हिवताप विभागाच्या आरोग्य सेवकांकडून येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच पाण्याचे कंटेनर, भांडी, डबकी यासह परिसरात डास अळ्यांचा शोध घेण्यात आला.
सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुण्यासदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. पालिका प्रशासन, तसेच हिवताप विभागाकडून जनजागृती करूनही नागरिक घर व परिसर स्वच्छ ठेवत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढू लागली आहे. तीन महिन्यांपूर्वी सदर बझार परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. याच परिसरात आता पुन्हा एकदा चिकनगुण्या व डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सातारा पालिकेकडून या परिसराची रविवारी स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात आली, तसेच हिवताप विभागाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय घरे, तसेच पाण्याने भरलेल्या कंटेनरची तपासणी करून डास अळ्यांचा शोध घेण्यात आला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काही लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावेत, तसेच घर व परिसराची स्वच्छता करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फोटो : जावेद खान