कऱ्हाड : शेरे, ता. कऱ्हाड येथे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. १० मार्चपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात येणार असून, घरोघरी तसेच वीटभट्टी, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन विद्यार्थ्यांची माहिती शिक्षक घेत आहेत. या सर्वेक्षणामध्ये स्थलांतरित होऊन आलेली मुले यांच्याही नोंदी घेतल्या जाणार आहेत. शेरे परिसरात केंद्रप्रमुख निवास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरु आश्रमशाळा, कृष्णा विद्यालय तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी घरोघरी जाऊन या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.
भाजपच्या कऱ्हाड दक्षिण उपाध्यक्षपदी कणसे
कऱ्हाड : शेणोली, ता. कऱ्हाड येथील माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश दिनकर कणसे यांची कऱ्हाड दक्षिण भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. प्रकाश कणसे यांची कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कऱ्हाड दक्षिण भाजपचे अध्यक्ष पै. धनाजी पाटील, सरपंच विक्रम कणसे, उपसरपंच संगीता माळी, माजी सरपंच नारायण शिंगाडे, झाकीर मुल्ला, वैभव कणसे, चंद्रकांत कणसे, रमेश बर्गे, प्रकाश कणसे, जयवंत कणसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमोद पाटील, शिवराज पाटील यांना पुरस्कार
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील रयत जिमखान्याचे प्रमोद पाटील, शिवराज पाटील यांना इचलकरंजी येथे पद्मजा फिल्मस् अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन सोलापूरच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडाभूषण आणि क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमोद पाटील यांच्या बॉडी बिल्डिंगमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल, तर शिवराज पाटील यांच्या कराटेतील यशाबद्दल त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली होती. पद्मजा खटावकर, बी. एस. पाटील व संयोजक विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शहापूरच्या सरपंचपदी मुल्ला यांची निवड
मसूर : शहापूर, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जशराज पाटील युवाशक्ती पॅनलचे ताजुद्दीन हुसेन मुल्ला, तर उपसरपंचपदी राजेंद्र ज्ञानू शेलार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश पाडळकर, तलाठी व ग्रामसेवक एम.एस. जाधव यांनी काम पाहिले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व मानणारी ही ग्रामपंचायत आहे. निवडणुकीत नऊपैकी आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. एका जागेसाठी निवडणूक होऊन राजेंद्र शेलार विजयी झाले आहेत.
स्वागत कमान उभारण्याची मागणी
कऱ्हाड : येथील साई मंदिर ते उर्दू हायस्कूल या रस्त्याला दिवंगत माजी उपनगराध्यक्ष अॅड. युनूसभाई कच्छी मार्ग असे नाव देण्यात यावे. तसेच याठिकाणी स्वागत कमान उभारण्यात यावी, या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार तसेच कऱ्हाड शहर मुस्लीम जमातच्या वतीने पालिकेच्या उपमुख्य अधिकारी विशाखा पवार यांना देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस उपाध्यक्ष समीर पटवेकर, हिम्मत मुजावर, कयूम मणेर, हारुण तांबोळी, आरिफ सुतार, मंजूर बागवान, रौस पठाण, शाहिद बारस्कर, रमजान कागदी, शाहरूख शिकलगार, आमीर शेख, युनूस मुजावर, गफूर सुतार आदी उपस्थित होते.