कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी तारेच्या कुंपणात अडकलेल्या पारव्याला जीवदान दिले. विद्यालयाच्या पाठीमागील बाजूला पोलीस ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये असणाऱ्या आडातील पाणी व्यवस्थित राहावे, त्यामध्ये झाडाची पाने पडू नयेत यासाठी जाळी मारण्यात आली आहे. मात्र या जाळीच्या दोऱ्यांमध्ये पारव्याचा पाय अडकला. ही बाब सोहम पाटील, हर्षद चव्हाण यांनी हरित सेनेचे समन्वयक जगन्नाथ माळी तसेच महेंद्र अंबवडे यांना सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी पारव्याला सुरक्षितरीत्या सोडवून जीवदान दिले.
सद्गुरू आश्रमशाळेला नितीन उबाळे यांची भेट
कऱ्हाड : सद्गुरू आश्रमशाळेला समाजकल्याण साहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गामध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचा आढावा घेतला. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत अध्यापन सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेचा सुसज्ज परिसर, शाळेची गुणवत्ता तसेच शिक्षकांची कार्यक्षमता पाहून त्यांनी समाधान मानले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या. तसेच निवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे, संभाजी पाटील, डी.आर. पाटील, विष्णू खरात, पी.जे. निकम, अभिजित आडके, अश्फाक अत्तर, नामदेव पाटील, सुमती कुरणे, सुजाता भोसले, प्रकाश फार्णे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
पाटणला मुलांच्या शाळेत विविध उपक्रम उत्साहात
रामापूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दोनच्या वतीने समुदाय आधारित सुपोषण, मुलीच्या जन्माचे स्वागत, कुपोषित बालकांना खाऊवाटप असा संयुक्त कार्यक्रम पाटण मुलांच्या शाळेत घेण्यात आला. या वेळी शहरातील महिला आणि मुली उपस्थित होत्या. त्यांना समुपदेशक विक्रम इंगवले यांनी कौटुंबिक समस्या निवारणाविषयी मार्गदर्शन केले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेविषयी जनजागृती केली. किशोरी मुलींनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. या वेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष विजय टोळे, नितीन पिसाळ, पर्यवेक्षिका एस.डी. पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हजर होत्या. प्रास्ताविक पर्यवेक्षिका एस. डी. पाटील यांनी केले. कन्या भाग्यश्री योजनेविषयी जनजागृती करण्यात आली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ याविषयी प्रबोधनात्मक रांगोळ्या या वेळी मुलींनी काढल्या होत्या.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नेटवर्क नसल्यामुळे मोबाइलधारक त्रस्त
कऱ्हाड : येळगाव, ता. कऱ्हाड परिसरात सध्या वारंवार मोबाइल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येवतीसह संपूर्ण विभाग अनेकदा आऊट ऑफ कव्हरेज होत असल्याने येथील इंटरनेटद्वारे केली जाणारी अनेक कामे खोळंबत आहेत. कऱ्हाड दक्षिण विभागातील डोंगरी विभाग म्हणून येवतीसह येळगाव परिसराची ओळख आहे. या परिसरातील ग्राहकांना सध्या मोबाइल असूनही वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटअभावी बँकेतील पैसे ऑनलाइन पद्धतीने पाठविणे आदी कामे करता येणे मुश्कील बनत आहे.