सातारा : अंघोळ करतानाची चित्रफीत काढून ब्लॅकमेल करत सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या गराड्यातच पीडित मुलीच्या नातेवाइकांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यासमोर काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शहर परिसरातील एका १७ वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित मुलाला रात्री ताब्यात घेतले होते. दरम्यान, ‘संशयिताच्या दोन मित्रांनाही तत्काळ ताब्यात घ्या व त्यांच्यावरही अत्याचाराचा गुन्हा दाखल करा,’ या मागणीसाठी रविवारी दुपारी २५ ते ३० महिला व पुरुष शहर पोलिस ठाण्यासमोर आले होते. याचवेळी अत्याचार प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताला पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत होते. जमावाने त्याला पाहिल्यानंतर दोन महिला व एका पुरुषाने त्याच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांच्या ताब्यात असताना त्या संशयिताला दोन महिलांनी धक्काबुक्की केली. यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला. पोलिसांनी या प्रकारानंतर पोलिस ठाण्यासमोरील जमाव पांगविला. या प्रकाराची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. दरम्यान, संशयित मुलाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचे दोन मित्र मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. (प्रतिनिधी)
मुलीची चित्रफीत काढणाऱ्या संशयितास धक्काबुक्की
By admin | Published: July 25, 2016 12:28 AM