जगदीप धोंडीराम थोरात (वय ४०, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले की, पडळ येथे असलेल्या के. एम. शुगर कारखान्यामध्ये गोवारेतील जगदीप थोरात हे प्रोसेसिंग हेड म्हणून काम पाहत होते. दरम्यान, कारखान्यात अफरातफर झाल्याच्या कारणावरून बुधवारी जबाबदार म्हणून थोरात यांना काहीजणांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जगदीप यांना अचानक त्रास होऊ लागल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सकाळी सहा वाजता कऱ्हाडात खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाइकांनी मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. त्यावरून तणाव निर्माण झाला. त्यानंतर मृतदेह वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
सायंकाळी उशिरा नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गोवारे येथे अंत्यसंस्कारासाठी नेला. याबाबत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे. नातेवाइकांनी केलेल्या आरोपाबाबत जबाब घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.
फोटो : ११केआरडी०७
कॅप्शन : कऱ्हाड (जि. सातारा)येथे मृतदेह ताब्यात घेण्यावरून तणाव निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी नातेवाइकांशी चर्चा केली.
फोटो : ११जगदीप थोरात