सातारा : शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत व यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून अद्याप वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील २ हजार ४११ शेतकºयांनी सौर कृषिपंपासाठी आॅनलाईन अर्ज केले असून, १ हजार १८८ जणांना कोटेशन देण्यात आले आहे.
कृषिपंपांना पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्हीए, १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र (डीपी) उभारण्यात येतात व त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अनेक अडचणी निर्माण होतात. दुर्गम किंवा डोंगराळ भागात वीजयंत्रणेचे जाळे नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच अखंडित व शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे ज्यांच्याकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व सिंचनासाठी पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा नाही, अशा शेतकºयांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. तसेच महावितरणकडे कोटेशनची रक्कम भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या शेतकºयांना प्राधान्याने सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिवसा सिंचन करता येणार आहे. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलांचा किंवा डिझेलचा खर्च नसल्याने सौरपंपाद्वारे विहीर, नदी, शेततळे, कालव्यामधून उपसा करून पिकांना पाणी देता येणार आहे.योजनेतील लाभार्थी हिस्सामुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून ३ एचपी सौर कृषिपंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के म्हणजे १६ हजार ५६० रुपये भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये भरावे लागणार आहे. तर ५ एचपी सौर कृषिपंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के म्हणजे २४ हजार ७१० रुपये भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना ५ टक्के म्हणजे १२ हजार ३६६ रुपये भरावे लागणार आहे. हे महाग वाटले तरी वीजबिल येणार नसल्याने पैशांची बचत होणार आहे.
कृषिपंपाच्या पारंपरिक वीजजोडणीसाठी सुमारे ५ हजार ५०० रुपये भरल्यानंतर शेतकºयांना ३ किंवा ५ अश्वशक्ती क्षमतेचे कृषिपंप मिळत होता. तर सौर कृषिपंप योजनेत कृषिपंप, सौर पॅनल, पंप कंट्रोलर, पाईप २ एलईडी बल्ब देण्यात येणार आहे. सौर कृषिपंप २५ वर्षे सेवा देऊ शकतो.या कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास विमा कंपनीकडून संबंधित लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळेल.