कऱ्हाडात काळी गुढी उभारून घोषणाबाजी, स्वाभिमानीचे आंदोलन; कर्जमाफी देणार नसल्याच्या वक्तव्याचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:00 IST2025-03-31T12:00:13+5:302025-03-31T12:00:44+5:30
कऱ्हाड : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी ...

कऱ्हाडात काळी गुढी उभारून घोषणाबाजी, स्वाभिमानीचे आंदोलन; कर्जमाफी देणार नसल्याच्या वक्तव्याचा निषेध
कऱ्हाड : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शासनासह मंत्री अजित पवार यांच्या निषेधार्थ काळी गुढी उभारत रविवारी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटकाव केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंंखे यांच्यासह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रारंभी, गुढीला साडीऐवजी काळे कापड बांधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारानजीक शासनाच्या निषेधार्थ काळी गुढी उभी करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफी देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची भावना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी व्यक्त केली, तसेच त्यांनी मंत्री अजित पवार यांच्यासह शासनाचा निषेध नोंदविला.
याच कालावधीत पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आंदोलकांना काळी गुढी उभारण्यास प्रतिकार करत गुढी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.