वडूज : स्वाभिमानी शेतकरी संघटना व पीडित शेतकऱ्यांनी थेट वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर हल्लोबोल करत व्यापाऱ्यांचे गाळे बंद केले. यामुळे चार ते पाच तास येथील तणावाचे वातावरण तयार झाले होते. व्यापारी, बाजार समितीचे आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बराच वेळ चर्चा होऊनही मार्ग निघत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या खरीप हंगामात घेवडा, मूग, उडीद आणि इतर सर्व कडधान्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आवकेचे प्रमाण वाढल्यानंतर कडधान्याच्या दराच्या बाबतीमध्ये तफावत जाणवू लागली आहे. मात्र, तरीही शेतकरी उरावर धोंडा ठेवून सणाच्या तोंडावर केवळ पैशांच्या निकडीसाठी शेतमाल व्यापाऱ्यांना घालत आहेत. शेती माल देऊन महिना उलटला, तरी पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांनाच धमकी व शिवीगाळ होत असल्याचे समजताच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीतील कारभार सुधारण्यासाठी लेखी निवेदन ही यापूर्वीच दिलेले होते.संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, ‘संघटनेची ताकद काय असते, ती या हल्लाबोलनंतर शेतकऱ्यांसह संबंधित प्रशासनाला समजली आहे. शेतीमालाची पक्की पावती दिली पाहिजे, अन्यथा त्या व्यापाऱ्याचे परवाने रद्द करावे. व्यापाऱ्यांकडून थकीत रक्कम माण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली, तसेच बेजबाबदारपणे बोलणाऱ्यांनीही जाहीर माफी मागितली, हा विजय एकीचा आहे. यापुढील काळात असेच संघटित राहून कार्यरत राहू यात. व्यापारी व शेतकरी यांच्यात स्नेहपूर्ण वातावरण पूर्वीपासून आहे. जगाच्या पोशिंद्याला सन्मान द्या.दत्तू घार्गे म्हणाले, ‘बाजार समितीचे प्रशासन बघ्याची भूमिका घेत, गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. मंदीचे कारण देऊन पैसे देण्याचा वायदा उलटल्यानंतरही व्यापारी वेळेवर पैसे देत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. व्यापारी खेळवाखेळवी करू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. काही व्यापारी शेतकऱ्यांच्या अंगावरही धावून जाऊ लागले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे बाजार समितीचा प्रशासन मूग गिळून गप्प आहे.’
यावेळी सूर्यकांत भुजबळ, श्रीकांत लावंड, विजय शिंदे, योगेश जाधव, अजय पाटील, विजय देवकर, बांबू सूर्यवंशी, संतोष बागल, राजू बागल, बाबा फडतरे आदींसह खटाव-माण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुन्हा निवडणुका लागल्यावर शेतकऱ्यांच्या दारात मत मागायला जायचे आहे, हे विसरू नका. आता शेतकरी अडचणीत असताना बाजार समितीमधील सत्ताधारी आणि विरोधक ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही बाब शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवणार आहे याचे भान आता राज्यकर्त्यांनी ठेवावे. - तानाजी देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना