Satara: सह्याद्री कारखाना निवडणूक: प्रादेशिक सहसंचालकांच्या 'त्या' निर्णयाविरोधात 'स्वाभिमानी'ची न्यायालयात धाव
By प्रमोद सुकरे | Updated: March 20, 2025 11:44 IST2025-03-20T11:43:23+5:302025-03-20T11:44:06+5:30
प्रमोद सुकरे कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेले ९ उमेदवारांचे अर्ज प्रादेशिक सहसंचालकांनी ...

Satara: सह्याद्री कारखाना निवडणूक: प्रादेशिक सहसंचालकांच्या 'त्या' निर्णयाविरोधात 'स्वाभिमानी'ची न्यायालयात धाव
प्रमोद सुकरे
कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेले ९ उमेदवारांचे अर्ज प्रादेशिक सहसंचालकांनी अपिलात वैद्य ठरवले. त्याचा निकाल हातात मिळाताच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे रंग दिसले. पण त्यातील प्रमुख उमेदवार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांच्या निकाला विरोधात पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनाउच्च न्यायालयात धाव घेत आहे. त्यासाठी बुधवारी दिवसभर ते मुंबईत तळ ठोकून होते. त्यामुळे या निवडणुकीचे रंग दररोज बदलत असल्याचे चित्र आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी सर्वांना बरोबर घेत दंड थोपटले आहेत.दोन्हीकडील उमेदवारांनी अर्ज दाखल केले.छाननीत काही अवैध झाले.त्यात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवासराव थोरात, उद्योजक बाबुराव पवार यांच्यासह ९ जणांचा समावेश होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता होती.
या निकाला विरोधात त्यांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे धाव घेत अपील दाखल केले. त्यामध्ये काँग्रेस समर्थक उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने कारखाना निवडणुकीत आता नवा टिस्ट निर्माण झाला आहे.
तोच बुधवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी मूळ हरकतदार असणारे उमेदवार मुरलीधर गायकवाड यांना घेत मुंबई गाठली. तेथे त्यांनी निवास थोरात यांच्या निकाला विरोधात रीट व्हेरिफिकेशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान अवैध ठरलेले अर्ज सोडून विरोधी पॅनेल मधील नेत्यांनी तशा पद्धतीने उमेदवारांची चाचपणी,व्हूरचना केलेचे समजते. मात्र आता हे अर्ज वैद्य ठरल्याने त्यांना सामावून घ्यायचे म्हटले तर नेत्यांचा कस लागणार आहे. अशीही चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे सत्ताधारी बाळासाहेब पाटील पॅनेलने आपले उमेदवार अंशतः निश्चित करीत प्रचाराचा जोर वाढवला आहे. पण त्यांचे समर्थक उमेदवार मानसिंगराव जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज अपीलावरील सुनावणीनंतरही अवैध ठरल्याने तो त्यांच्या पॅनेलला धक्का मानला जात आहे.
'त्यांनी' घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट
सह्याद्री कारखाना निवडणुकीत काँग्रेस समर्थक असणाऱ्या ९ उमेदवारांचे अर्ज प्रादेशिक सहसंचालकांनी मंगळवारी वैध ठरवले. त्यानंतर बुधवारी सकाळी यातील प्रमुख उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यात सविस्तर चर्चाही झालेचे समजते.
जगदाळे काय करणार ?
सत्ताधारी पॅनेलचे मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज प्रादेशिक सहसंचालकांनीही अवैधच ठरवला आहे. त्यांना देखील आपिलात जाण्याची संधी आहे. ते आपिलात जाणार काय ?याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
निवास थोरात यांच्या उमेदवारी अर्जावर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हरकत घेतली होती. हरकत बरोबर असल्यानेच त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. मात्र प्रादेशिक सहसंचालकांनी अपिलात त्यांचा अर्ज वैध ठरवला. हा निर्णय आम्हाला मान्य नसून त्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्यासाठी आम्ही मुंबईत आलो आहोत. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना