सातारा : एक रकमी एफआरपी, वजनकाटे ऑनलाईन करणे, रिकव्हरीतील चोरी थांबविणे आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दि. १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ऊसतोड बंद आंदोलन जाहीर केले असून, पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. ऊसतोडबरोबरच वाहतूक बंद होती. त्यामुळे शिल्लक उसावरच कारखाने सुरू होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद मागील महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात झाली होती. या ऊस परिषदेत विविध ठराव झाले होते. तसेच अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर संघटनेने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मागण्यांसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. तरीही मागण्यांबाबत निर्णय न झाल्याने संघटनेने राज्यातच १७ आणि १८ नोव्हेंबरला ऊसतोड बंद आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारपासून या आंदोलनाला सुरुवात होत आहे.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, ‘तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा कायदा राज्य शासनाने केला आहे. हा कायदा रद्द करुन एक रकमी एफआरपी देण्याची आमची मागणी आहे. तसेच रिकव्हरीतील चोरी थांबवावी, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद करावेत. दरवर्षी मजूर आणि मुकादम ऊस वाहतूकदारांना गंडा घालतात. याला आळा घालण्यासाठी ऊस मजूर महामंडळाची स्थापना करावी. या महामंडळामार्फत मजूर पुरवावेत. तसेच ही प्रक्रिया ऑनलाईन करावी, महामंडळाला निधी जमा करण्यासाठी प्रती टन १० रुपयांची कपात करावी, आदी आमच्या मागण्या असून त्या शेतकरी हिताच्या आहेत.दरम्यान, गुरुवारी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ऊसतोड बंद होती. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड मजुरांना भेटून आवाहन केले. तर ऊसतोड झाली नसल्याने वाहतूक बंद होती. फक्त बुधवारी तोडलेला ऊसच कारखान्याकडे घेऊन जाताना एखादे वाहन दिसत होते.
जिल्ह्यातील कारखानेही ३० मार्चच्या पुढे चालणार नाहीत, असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आंदोलनादरम्यान तोडी घेऊ नयेत. वाहतूकदारांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना