प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: साखर कारखानदारांनी विना कपात एक रकमी एफ आर पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे. अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. मात्र याकडे कोणीच हवे तसे लक्ष देत नाही. म्हणूनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ व १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करीत आहोत. त्यातूनही दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कराड येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, "या २ दिवसात शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत. रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे. आमच्या या आंदोलनाला अनेक ऊसतोड वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमच्यात नेहमी सारखा संघर्ष होणार नाही.असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार विरोधात बोलण्याची साखर कारखानदारांची हिंमत नाही. मग आम्ही संघर्ष करतोय तर त्याला कारखानदारांनी खोडा न घालता पाठिंबा द्यावा अशा भावनाही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावर्षी एफ आर पी कशावर ठरवली ?असा सवाल करीत शेट्टी म्हणाले, खतांच्या, औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्याचा विचार केला का? आदी मुद्दे घेऊन आम्ही कृषीमूल्य आयोगाकडे मांडणार आहोत."
हा तर शेतकऱ्यांचा दोष- जिल्ह्यात अनेक कारखानदारांनी एफआरपी जाहीर न करताच गळित हंगाम सुरू केला आहे? याबाबत विचारताच शेट्टी म्हणाले, हा तर शेतकऱ्यांचा दोष आहे. शेतकरी जागृतपणे जाब विचारत नाहीत त्यामुळे कारखानदार मस्तावले आहेत. त्यांची मस्ती उतरण्याची ताकद शेतकऱ्यांच्या एकजुटीत आहे. ती दाखवण्यासाठी स्वाभिमानाच्या आंदोलनाला पाठिंबा देणे गरजेचे आहे.
आता मी फक्त शेतकऱ्यांबरोबर- सध्या आपण सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही दिसत नाही? असे छेडले असता शेट्टी म्हणाले, आता मी सगळे प्रयोग बंद केले आहेत. मी फक्त शेतकऱ्यांच्या बरोबर आहे व कायम राहणार आहे.
कृषिमंत्र्यांनी प्रामाणिक काम करावे- कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा समाचार घेताना शेट्टी म्हणाले, त्यांनी आपली वटपट बंद करावी. केवळ फोटो काढण्यापूरते बांधावर न जाता प्रामाणिकपणे कृषी मंत्री म्हणून काम करावे.