सातारा : कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी या छोट्याशा गावाने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ‘आता नाय तर कधीच नाय’ अशी हाक देत आबालवृद्धांकडून पाणीदार गावासाठी श्रमदान केले जात आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामस्थांनी यात्रेसाठी गोळा केलेल्या पैशातून विविध कामे केली जात आहे.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव आणि माण तालुक्यातील १६० हून अधिक गावे ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी झाली आहेत. असे असताना कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी ग्रामस्थही गट-तट विसरून दुुष्काळ हद्दपार करण्यासाठी एकवटले आहेत. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून गावकऱ्यांनी नाला बंडिंग, समतल चरी, पाझर तलाव, बंधारे आदी कामे सुरू केली आहेत.आतापर्यंत या गावाने अनेकदा दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. मात्र, आता हा दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याचा निर्धार महिला व युवतींनी केला आहे. गावाच्या तीन्ही बाजूला डोंगर असून या डोंगरांवर ७० हून अधिक बंधारे बांधण्यात आले आहेत. गावातील सुमारे ३०० ग्रामस्थ दररोज श्रमदान करीत आहेत.नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणाºया ग्रामस्थांकडूनही गावात येऊन श्रमदान केले जात आहे. त्यामुळे शिवारात तुफान आल्याचं चित्र दिसत आहे.
बोधेवाडी गावाने वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. गावातील दुष्काळ हटविण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. सध्या विविध कामे करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यात्रेसाठी गोळा केलेले पैसे कामासाठी वापरले जात आहेत.- रुक्मिणी माने, सरपंच