सागर गुजरसातारा : कोरोनाचा विकार मृत्यूच्या रुपानं रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी दबा धरून बसलाय. राष्ट्रीयकृत बँका तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून लोक जमा होताना पाहायला मिळत आहेत. आता जणूकाही याच मरणाच्या प्रांतात जगण्यासाठी लोकांची झुंबड उडालीय!
प्रधानमंत्री जनधन योजना, शेतकरी सन्मान योजना तसेच उज्ज्वला गॅसची रक्कम योजनांतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. ही रक्कम काढून घेण्यासाठी बँकांसमोर तोबा गर्दी होते. प्रधानमंत्री जनधन योजनेतून महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये तर ज्ज्ज्वला गॅस धारकांच्या खात्यावर ७५० रुपये केंद्र शासनाने जमा केले आहेत.
शासनाकडून जमा झालेले पैसे काढून घेण्यासाठी प्रत्येक बँकेबाहेर तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतांशी राष्ट्रीयकृत बँकांच्या बाहेर खातेदारांच्या रांगा लागलेल्या आहेत.
ग्राहकांसाठी बँकांची वेळ सकाळी आठ ते अकरा एवढी मर्यादित असल्याने शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या ग्राहकांना सेवा देण्यात बँकांना अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. त्यातच बँकांच्या बाहेर उन्हातानात लोक उभे राहतात. यातून नवीन समस्या निर्माण होताना दिसत आहेत. बँकांच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंगचा अभाव तीव्रतेने जाणवतो. यातून एखादा कोरोनाबाधित या रांगेत उभा असेल तर साहजिकच कोरोनाचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता आहे.
बँकांत समोर दररोज उभी राहणारी ही रांग थोपवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. या व्यतिरिक्त किराणा, रेशनिंग दुकान तसेच भाजीपाला विक्री केंद्रांवर लोकांची झुंबड उडते. ही गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना प्रशासनाला करावी लागणार आहे. तरच कोरोनाचा प्रसार थांबू शकतो.
- खरेदीच्या वेळा ठरल्याने गर्दी
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीचा वेळा ठराविक असल्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्यांवर मोठी गर्दी होत आहे. सकाळी आठ ते अकरा ही मर्यादित वेळ किराणा व भाजीपाला खरेदीसाठी तसेच रेशन खरेदीसाठी केल्यानं जणूकाही या कालावधीत कोरोना विश्रांती घेतो, अशा अविर्भावात लोक रस्त्यावर उतरताना दिसतात.
प्रशासनाने किराणा माल आणि भाजी घरपोच देण्याचं जाहीर केलं असलं तरी अजून किराणा माल घरपोच करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे किराणा आणि रेशनिंग आणण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं.- महेश पाटील