लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुक्यात विविध ठिकाणी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वास्तविक राष्ट्रीय सणाला ध्वजारोहणाचा मान मिळावा, यासाठी अनेक पदाधिकारी प्रयत्नशील असतात. मात्र खंडाळा येथील सभापती निवासची देखरेख ठेवणाऱ्या सफाई कामगाराला ध्वजारोहणाचा मान देऊन खंडाळ्याच्या सभापतींनी वेगळा पायंडा पाडला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खंडाळ्याचे सभापती राजेंद्र तांबे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सफाई कामगाराला ध्वजारोहणाचा मान देऊन अनोखा सन्मान केला. पंचायत समितीमधील सुभाष मंडले हे गेली़ अनेक वर्षे सफाई कामगार म्हणून प्रामाणिक सेवा करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ध्वजारोहणाचा मान देऊन वेगळा उपक्रम राबविण्यात आला . तसेच तहसील कार्यालयात तहसीलदार दशरथ काळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर गावोगावी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, विकास सोसायटी, जिल्हा बँक, माध्यमिक विदयालय व प्राथमिक शाळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
(चौकट)
विद्यार्थिनीला मान...
खेड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान गावातील माध्यमिक शाळेत दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली विदयार्थिनी प्रतीक्षा धायगुडे व तिचे वडील पांडुरंग धायगुडे यांना देण्यात आला. सरपंच गणेश धायगुडे यांनी गावात प्रथमच असा उपक्रम राबविल्याने ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
फोटो : १६ खंडाळा