नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मागील काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या साखरेचा दर वाढू लागला आहे. सणामुळे असणारी मागणी व पाश्चात्त्य देशातही दर वाढल्याने निर्यातीला चालना मिळू शकते. या कारणांनी क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची वाढ आहे. त्यामुळे बाजारातही किरकोळ विक्रीचा किलोचा दर रुपयाने वाढला आहे. त्यामुळे ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी होत चालला आहे, तसेच साखरेचा दर आणखी वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे आगामी काळातील सणासुदीतही गोडवा कमीच होणार आहे.
..............
क्विंटलमध्ये...
जिल्ह्याला दररोज लागते साखर १००००
श्रावण महिन्यात मागणी वाढली १२०००
........................
साखरेचे दर (प्रति किलो)
जानेवारी ३४
फेब्रुवारी ३४
मार्च ३४
एप्रिल ३४
मे ३५
जून ३५
जुलै ३५
ऑगस्ट ३६
.......................................
का वाढले भाव...
मागील काही महिन्यांपासून साखरेचा दर स्थिर होता, पण आता सणाचे दिवस आहेत. त्यामुळे साखरेला मागणी वाढली आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून साखरेचा दर वाढत चालला आहे. क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ आहे. त्यामुळे साखरेचा किरकोळ विक्री दर वाढविण्यात येऊ लागला आहे. येणाऱ्या काळात अनेक सण आहेत. त्यामुळे दर आणखी वाढू शकतो.
- संजय भोईटे, दुकानदार सातारा.
................................................
शासनाने महिन्याचा साखर कोटा कमी केली आहे. त्यातच सणाचे दिवस असल्याने साखरेला मागणी वाढत आहे. पाश्चात्त्य देशातही साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे निर्यातीला चालना व एमएसपी वाढू शकते. त्यामुळे होलसेल साखरेचा भाव क्विंटलला ५० ते ६० रुपयांनी, तर एम ग्रेडचा दर १०० रुपयांनी वाढला आहे. दरात आणखी वाढ होऊ शकते.
- जितेंद्र देवदारे, साखरेचे होलसेल व्यापारी, सातारा.
......................................................
महिन्याचे बजेट वाढले...
मागील काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे घर खर्चाचे बजेट कोलमडलेले आहे. त्यातच डाळींच्या दरात थोडी वाढ झाली असतानाच आता साखरही महाग झाली आहे. आता सणाचे दिवस आहेत. त्यामुळे साखरेची जादा खरेदी करावी लागते. त्यातच दर वाढीने महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
- कविता पाटील, गृहिणी.
................
कोरोना विषाणूच्या संकटामुळे लोकांची कामे गेली. त्याचबरोबर या संकटामुळे महागाईही आली. घरात भाजीपाला, डाळी अन् साखरच अधिक लागते. भाजी आणि डाळींचे दर अगोदरच वाढले आहेत. त्यातच आता साखरेचा दर किलोमागे एक रुपयाने वाढला असला तरी आणखी महाग होऊ शकते. त्यामुळे घरखर्चावर मर्यादा आलेल्या आहेत.
- सुनीता कुऱ्हाडे, गृहिणी.
...............................................................