कऱ्हाड: जुळेवाडी (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक नशा करण्यावरून झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील एकासह तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच अन्य संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.
सागर करडे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर अभिनंदन झेंडे व अन्य दोघेजण (नावे समजू शकली नाहीत) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिनंदन झेंडे याला पोलिसांनी हद्दपार केला होता. शुक्रवारी रात्री अभिनंदन झेंडे व रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर करडे हा जुळेवाडी येथे नशा करत होते. नशेत असताना अभिनंदन झेंडे व सागर करडे याच्यांत नशा करण्यावरून वाद झाला. त्यावेळी सागर करडे याने अभिनंदन झेंडे याला मारहाण केली. मारहाण केल्याचा राग मनात धरून शनिवारी सकाळी अभिनंदन झेंडे त्याच्या साथीदारासह तलवारीसारखे हत्यारे घेऊन जुळेवाडी येथे जाऊन सागर करडे याच्या डोक्यात तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी करून पलायन केले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर व त्यांचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर करीत आहेत.