पिंपोडे बुद्रुक : जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या सुधारित आदेशात औद्योगिक क्षेत्राबाबत स्पष्टता नसल्याने औद्योगिक कामगारांचे हाल होत असून, कामगारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या फैलावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेशाद्वारे अत्यावश्यक सेवा वगळता जमावबंदी, संचारबंदीबाबत नव्याने कडक निर्बंध जारी केले. नवीन आदेशानुसार औद्योगिक क्षेत्रात अत्यावश्यक वस्तू उत्पादन, निर्यात पुरवठा व उत्पादन त्वरित सुरू अथवा त्वरित बंद करता येणार नाही, अशा कारखान्यांना सूट देण्यात आली आहे. तथापि, अशाठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या राहत्या घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंतच्या हालचालीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने औद्योगिक कामगारांचे मोठे हाल होत आहेत. एकीकडे ग्रामीण भागातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारे इंधन, पोलीस, ग्राम सुरक्षा समिती यांचा होणारा त्रास तर दुसरीकडे कामावर हजर न राहिल्यास कंपनी प्रशासनाकडून कामावरून कमी करण्याची भीती अशा दुहेरी संकटाचा सामना औद्योगिक कामगारांना करावा लागत आहे. यामध्ये महिला कामगारांचीही फरपट होत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रात विशेष लक्ष केंद्रीत करून आदेशाची काटेकोर अंमलबजावणी न करणाऱ्या औद्योगिक प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी मागणी कामगारवर्गातून होत आहे.
कोट..
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गेले दोन दिवस औद्योगिक व बिगर औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून औद्योगिक कारखान्यांनी कामाच्या ठिकाणी केलेल्या कोरोना संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांची पाहणी केली आहे. तसेच यावेळी अत्यावश्यक सेवा, निर्यात पुरवठादार यांना भेडसावणाऱ्या समस्यांची चर्चा करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
- शरद आचार्य, क्षेत्र व्यवस्थापक, सातारा.