कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी ४९ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांपैकी २७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता २२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. पंचायत समितीच्या दहा गणांसाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० जणांनी माघार घेतल्याने आता ३६ जण आपले नशीब आजमावत आहेत. गट व गणासाठी होणाऱ्या संघर्षपूर्ण लढतीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे किन्हई पंचायत समिती गणातील उमेदवार तुकाराम वाघ यांनी अनपेक्षितरीत्या माघार घेतली, त्यानंतर काँग्रेसने लागोलाग अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अॅड. अमोल राशीनकर यांचा पक्ष प्रवेश घडवत त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. एकंदरीत तालुक्यात काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी (दि. १३) सकाळी ११ ते दुपारी ३ ही वेळ ठेवली होती. त्यामुळे सकाळपासून तहसीलदार कार्यालय आवारात गर्दी होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापासून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी नाराजांची समजूत काढत त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राजी केले होते, त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांची फौज या परिसरात तैनात होती. राजकीयदृष्ट्या धगधगत्या पिंपोडे बुद्रुक गटात सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस होती. मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा गट फलटण विधानसभा मतदार संघात मोडत असल्याने तेथील निर्णय फलटणमधून होत होते. सकाळी या गटातून विद्यमान सदस्य सतीश धुमाळ, राहुल कदम, लालासाहेब शिंदे, सुधीर धुमाळ, शहाजी भोईटे, संभाजी शिंदे, आनंद भोईटे यांनी माघार घेतली. या गटात आता पंचरंगी लढत होणार आहे. वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून ७ जणांनी माघार घेतल्याने आता तिरंगी लढत होत आहे. सातारारोड गटातून २, ल्हासुर्णे गटातून ६ तर वाठार किरोली गटातून ४ अर्ज माघारी घेण्यात आले.पंचायत समिती गणांमध्ये सर्वाधिक अर्ज पिंपोडे बुद्रुक गणात दाखल झाले होते. तेथे ८ जणांनी माघार घेतली असून, तेथे चौघेजण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. देऊर गणामध्ये ३, वाठार स्टेशन गणामध्ये ४, किन्हई गणामध्ये ६, सातारारोड गणामध्ये ३, कुमठे गणामध्ये १, ल्हासुर्णे गणामध्ये २, एकंबे गणामध्ये ५, साप गणामध्ये ३ तर वाठार किरोली गणामध्ये ५जणांनी माघार घेतली. एकंदरीतकाही गणांमध्ये दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
मातब्बरांकडून तलवारी म्यान
By admin | Published: February 13, 2017 10:47 PM